साईमत न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी वणीसह ग्रामीण व शहरी भागातील वास्तव चित्र वेगळेच दिसत आहे. शहरातील रस्ते, बसस्थानक, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच गल्लीबोळांमध्ये अनेक नागरिक उघडपणे गुटखा सेवन करताना आणि थुंकताना दिसून येत आहेत. प्रतिबंधित असतानाही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने “हा माल नेमका येतो कुठून?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. ग्राहकाला हवा असलेला ब्रँड काही मिनिटांत उपलब्ध होत असल्याने बंदी असूनही पुरवठा कसा सुरू राहतो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात असल्या तरी गुटख्याची साखळी मात्र पूर्णपणे मोडीत निघालेली नाही. एखादा साठा जप्त झाला की काही वेळातच दुसऱ्या ठिकाणी पुन्हा विक्री सुरू होत असल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण व्यवहारामागे संघटित तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घाऊक पुरवठादार, वाहतूकदार आणि किरकोळ विक्रेते अशी साखळी तयार झाल्याचे बोलले जात असून, इतर राज्यांतून विविध मार्गांनी गुटखा महाराष्ट्रात आणला जात असल्याची चर्चा आहे. काही वेळा दुधाची वाहने, भाजीपाला गाड्या आणि मालवाहू वाहनांचा वापरही या तस्करीसाठी होत असल्याची शक्यता वर्तवली जाते.
वाहतूक पोलिस जसे नियमित तपासण्या करतात, तसेच संयुक्तरीत्या गुटखा रोखण्यासाठी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाच्या तपासण्या किती वेळा केल्या जातात, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सीमावर्ती आणि प्रमुख प्रवेशमार्गांवर नियमित मोहीम राबवली जाते का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. वर्षातून एखादी मोठी कारवाई करून प्रसिद्धी मिळते, मात्र नंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचा आरोप होत आहे.
गुटख्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असताना प्रशासनाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. केवळ साठे जप्त करणे किंवा आकडेवारी जाहीर करणे पुरेसे नसून संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेऊन ती उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अन्यथा बंदीचे फलक कायम राहतील आणि गुटख्याचा अवैध व्यापार मात्र अव्याहत सुरूच राहील.
