साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्याचे नियोजन सुरू आहे. निमाणी बसस्थानक परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ४०० बस फेऱ्या तपोवन येथील सिटीलिंक बस डेपोतून सुरू करण्याचा विचार केला जात आहे.
द्वारका अंडरपासच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्या मेळा आणि सीबीएस बसस्थानकांवरील काही बसफेऱ्या पंचवटीतील निमाणी बसस्थानकातून चालवल्या जात आहेत. मात्र अरुंद रस्ते आणि वाढती गर्दी यामुळे या परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
ही कोंडी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने तात्पुरता उपाय म्हणून तपोवन आगार हा पर्याय समोर ठेवला आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार मार्ग वगळता इतर सर्व मार्गावरील बसेस तपोवनमधून सुरू करण्याचा विचार सुरू असून याबाबत अधिकाऱ्यांकडून नियोजन केले जात आहे.
या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, येवला, विंचूर, निफाड यासह विविध मार्गांवरील प्रवाशांना शहरातून थेट तपोवन बसस्थानक गाठावे लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि प्रवासखर्च वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाचा हा निर्णय वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
