साईमत -मुंबई- प्रतिनिधी |
मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील महापौर दालनात बुधवारी एक अत्यंत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आढावा बैठकीसाठी आलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पत्रकार यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादानंतर संतापलेले सोमय्या पत्रकार परिषद अर्धवट सोडून तरातरा निघून गेले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
बुधवारी सकाळीच मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौरांचे दालन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल प्रशासनाला आला होता. या खळबळजनक धमकीच्या पार्श्वभूमीवर महापौरांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी महापौर दालनाबाहेर थांबले होते. त्याच वेळी आतमध्ये महापौरांसोबत जन्म-मृत्यू प्रमाणपत्राबाबत आढावा बैठक सुरू होती, ज्याला माजी खासदार किरीट सोमय्या देखील उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कॅमेऱ्यासह दालनात दाखल झाले. मुंबईच्या महापौर बाजूलाच बसलेल्या असताना किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना ‘आधी माझा बाईट घ्या’ असे म्हणत फर्मान सोडले. मात्र, पत्रकारांनी महापौरांसमोरचे माईक हटवण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून सोमय्या प्रचंड संतापले आणि त्यांच्यात व पत्रकारांमध्ये तीक्ष्ण वादावादी सुरू झाली. महापौरांनी मध्यस्थी करत सोमय्या यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पत्रकारांनी थेट महापौरांनाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यामुळे सोमय्या तिथून तरातरा रागाने निघून गेले.
’बिनपदाचे सुपर महापौर’; ठाकरे गटाचा बोचरा वार
किरीट सोमय्या यांच्या या वर्तनावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर (X वर) एक व्हिडिओ पोस्ट करत सोमय्यांवर ‘बिनपदाचे सुपर महापौर’ म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:
”मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय – ‘बिनपदाचे सुपर महापौर’ – नाव: किरीट सोमय्या! ना निवडणूक लढवली, ना जनतेने निवडलं, ना कोणतं अधिकृत पद; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात. काम काय? तर महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं आणि पडद्यामागून सूत्र हलवणं! आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला, त्याची जागा दाखवली तेव्हा ‘सुपर महापौर’ साहेबांनी काय केलं? चक्क उठून निघून गेले! वाघ बनून बसलेले… कोल्ह्यासारखे पळाले!”
पालिकेत आणि राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा
कोणतेही अधिकृत पद नसताना किरीट सोमय्या महापालिकेच्या शासकीय बैठकांमध्ये महापौरांच्या शेजारी बसून ज्या प्रकारे अधिकार गाजवतात, त्यावरून आधीच विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतले जात होते. त्यातच बुधवारी पत्रकारांसोबत झालेल्या या जाहीर वादानंतर आणि सोमय्यांच्या हट्टापायी झालेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे पालिकेच्या वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात सध्या किरीट सोमय्या हेच चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
