रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुसावळ–दादर एक्स्प्रेस २१ डब्यांची
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून भुसावळ–दादर मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांची रचना वाढवून आता १९ ऐवजी २१ डब्यांसह गाड्या धावणार आहेत. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भुसावळ, जळगावसह संपूर्ण खान्देशातून मुंबईकडे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रोजगार, शिक्षण, व्यवसाय तसेच मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांची या मार्गावर सातत्याने गर्दी असते. त्यामुळे विशेषतः सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात आरक्षण मिळणे कठीण होत होते.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०४९ दादर–भुसावळ विशेष व ०९०५० भुसावळ–दादर विशेष या गाड्यांमध्ये १२ जूनपासून सुधारित रचना लागू केली आहे. तसेच ०९०५१ दादर–भुसावळ विशेष व ०९०५२ भुसावळ–दादर विशेष या गाड्यांमध्ये १३ जूनपासून बदल लागू करण्यात आले आहेत. याशिवाय १९००३ दादर–भुसावळ व १९००४ भुसावळ–दादर नियमित एक्स्प्रेसमध्ये १६ जूनपासून ही नवीन रचना लागू होणार आहे.
नवीन संरचनेनुसार आता या सर्व गाड्यांमध्ये एकूण २१ डबे असतील. त्यामध्ये एक वातानुकूलित प्रथम व द्वितीय श्रेणी डबा, एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, नऊ शयनयान डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे तसेच दोन सामान व गार्ड ब्रेक व्हॅन यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विशेषतः वातानुकूलित व शयनयान श्रेणीतील प्रवाशांसाठी अधिक आसन उपलब्ध होणार असून प्रतीक्षा यादीत अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या मागणीला अखेर यश आले असून हा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
भुसावळ–दादर रेल्वे सेवा ही संपूर्ण खान्देश आणि मुंबईदरम्यानचा मुख्य दुवा असल्याने या वाढीव डब्यांमुळे प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि उपलब्धतायुक्त होणार असल्याचे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
