मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून 2026 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असून, राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांसाठी सरकारने तब्बल 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या निर्णयामुळे जवळपास 5 लाख शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येणार असून, अनेक वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
