शस्त्रसाठा जप्त, फरार व तडीपार आरोपींवर मोठी कारवाई
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसविण्यासाठी भुसावळ पोलिसांनी मंगळवारी पहाटे व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत बेकायदेशीर शस्त्रे, चोरीची दुचाकी आणि अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला असून तडीपार व फरार आरोपींसह अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली १० जून रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत भुसावळ उपविभागात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी पोलिसांची पथके तैनात करण्यात आल्याने गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली.
मोहीमेदरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगार, फरार आरोपी आणि तडीपार व्यक्तींच्या संभाव्य अड्ड्यांवर छापे टाकले. रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच विविध लॉजेसमध्येही तपासणी मोहीम राबविण्यात आली. एकूण ६३ संशयित घरांची झडती घेण्यात आली, तर ९९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. याशिवाय ११२ वाहनांची तपासणी करून २३ संशयित वाहने जप्त करण्यात आली. ५४ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात आली.
चार आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईदरम्यान चार जणांकडून बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली. दिनदयाल नगर येथील समीर शहा जब्बार शहा याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. तर शम्मी प्रल्हाद चावरिया व दानिश शेख अकील यांच्याकडून प्रत्येकी एक तलवार, तसेच केवल अनिल टाक याच्याकडून धारदार चॉपर जप्त करण्यात आला. या सर्व आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला संदीप बुधा खंडारे हा परवानगीशिवाय भुसावळ शहरात फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली.
चोरीची ॲक्टिव्हा हस्तगत
मच्छी मार्केट परिसरातून पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीची चोरीची होंडा ॲक्टिव्हा जप्त केली. ही दुचाकी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात समोर आले असून पुढील तपासासाठी ती चोपडा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
अवैध दारूविक्रीवरही घाव
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच खंडवा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अटक वॉरंटमधील फरार आरोपी सल्तनत अली इराणी यालाही अटक करण्यात आली.
२० अधिकारी, १९८ अंमलदारांचा सहभाग
या विशेष मोहिमेत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि एकूण १९८ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. यामध्ये १५ महिला पोलिसांचाही समावेश होता.
पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि व्यापक कारवाईमुळे भुसावळ उपविभागातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
