लाखोंचे साहित्य जळून खाक, मोठा अनर्थ टळला
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एल सेक्टरमध्ये सोमवारी दुपारी एका कुलर निर्मिती करणाऱ्या कारखान्यात अचानक भीषण आग लागून मोठी खळबळ उडाली. या आगीत कारखान्यातील कच्चा माल, तयार कुलर आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुलर निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामकाज सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणगीमुळे कारखान्यात आग लागली. कुलर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुके गवत (पॅड), प्लास्टिकचे भाग आणि अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे उंच लोळ आणि घनदाट धूर दूरवरूनही स्पष्ट दिसत होता.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेल्या कारखान्याला अगदी लागूनच लाकडाची मोठी वखार असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा सुरू करून मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारखान्याचे मालक लल्लन यादव यांनी घटनेबाबत माहिती देताना मोठ्या आर्थिक नुकसानीची कबुली दिली असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिस व प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीचा अचूक आढावा घेतला जात आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
