महानगरपालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन : ऐन उन्हाळ्यात महिलांना घ्यावा लागतोय खासगी टँकरचा आसरा; १५ दिवसांत तोडगा न निघल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
जळगाव
महानगरपालिका हद्दीतील वाघ नगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या इतर भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, वाघ नगरकरांना मात्र तब्बल १० ते १२ दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुढील १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा ‘वंचित’ने दिला आहे.
वाघ नगर परिसरात मोठी लोकसंख्या असून यात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू असतानाच पाणी गायब झाल्याने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि स्वच्छतेसाठी नागरिकांना दरमहा हजारो रुपये खर्च करून खासगी टँकर मागवावे लागत आहेत. यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. ‘स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे हा आमचा मूलभूत हक्क आहे, मग प्रशासन आमची अडवणूक का करत आहे?’ असा संतप्त सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे.
’या’ आहेत प्रमुख मागण्या:
वाघ नगर परिसरात तातडीने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.
जळगाव शहरातील इतर भागांप्रमाणे येथेही किमान दिवसाआड पाणी देण्यात यावे.
पाणी कधी सुटणार याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून नागरिकांना पूर्वसूचना द्यावी.
उन्हाळ्याची भीषणता लक्षात घेता तात्पुरती अतिरिक्त पाण्याची सोय करावी.
जलवाहिनी जुनी झाली असल्यास नवीन पाईपलाईन आणि जलसाठ्याची तांत्रिक सोय करावी.
वाघ नगरकरांची ही समस्या केवळ स्थानिक पातळीवर न राहता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, जळगावचे पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी यावर ठोस कारवाई होणार की प्रशासन आंदोलनाची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, महानगर उपाध्यक्ष प्रवीण ढगाळे, युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल, तसेच रवींद्र तायडे, जितेंद्र उघारे, गौतम मेश्राम, भास्कर खरे, सुरेश चव्हाण यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
