साईमत न्यूज नेटवर्क –
शहरातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शनिवारी (दि. ६) दोन गंभीर दुर्घटना घडल्या. या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून एका लाइनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे खासगी वीज वितरण कंपनी एमपीएसएलच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नुमानीनगर गल्ली क्र. ४ येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद युसूफ अन्सारी उर्फ गड्डू वायरमन (वय ३२) हे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास संगमेश्वर परिसरातील कब्रस्तानात वीज मीटर बदलण्यासाठी गेले होते. मीटर बदलल्यानंतर वीजजोडणी करण्यासाठी ते खांबावर चढण्याच्या तयारीत असताना मीटर पेटीत अजूनही विद्युतप्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. यावेळी नगरसेवक शेख खालिद हाजी, सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख, खालिद एस. के. आणि झिया मुस्कान यांनी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.
दरम्यान, इस्लामाबाद भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत मोहम्मद दानियाल मोहम्मद माजिद (१३) हा मुलगा क्रिकेट खेळत असताना त्याचा चेंडू घराच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी तो छतावर गेला असता, तेथे गेलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला.
परिसरातील नागरिकांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे त्याचा जीव वाचला. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही घटनांनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून नगरसेवकांनी एमपीएसएलच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याचा आरोप करत पीडित कुटुंबांना योग्य भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
