एकाच दिवसात हजारो कारवाया १९६ गुन्ह्यांची नोंद
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या विशेष धडक मोहिमेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली आहे. दि. ५ जून रोजी एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गुन्हेगार, अवैध धंदे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडसत्र, तपासणी मोहीम आणि प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. अवैध व्यवसायांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासोबतच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटकांवरही पोलिसांनी निर्णायक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारूबंदी कायद्यांतर्गत १९६ गुन्हे दाखल करत २१ लाख ६५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे नोंदविण्यात आले, तर जुगार अड्ड्यांवर कारवाई करत ७६ गुन्हे दाखल करून ४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शस्त्र अधिनियमांतर्गत ४ गुन्हे आणि अमली पदार्थ सेवन प्रकरणी १० गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच COTPA कायद्यांतर्गत तब्बल २०३ कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वयेही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम २८५ अंतर्गत २२ गुन्हे, कलम १२६ अंतर्गत २०१ बाँड, कलम १२९ अंतर्गत १७ बाँड तसेच संशयास्पद वास्तव्याच्या ५ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करत १,४४३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ९ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली. २०८ हॉटेल्सची तपासणी, ४२ अटक वॉरंट आणि ५२ जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणीही करण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीच्या ६ प्रकरणांवर कारवाई करत २ फरार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
