बाल कल्याण समितीतून उघड झाला धक्कादायक प्रकार
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
शहरातील जैनाबाद परिसरात १५ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी असून, डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (रा. जैनाबाद, जळगाव) याने तिला फूस लावून घरातून पळवून नेले. त्यानंतर तिला जैनाबाद येथील राहत्या घरी डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार बाल कल्याण समितीसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबातून उघड झाला. त्यानंतर पीडितेच्या आईने जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे ४ जून २०२६ रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत आरोपीला त्याच दिवशी सायंकाळी अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आढावा घेतला.
या घटनेनंतर जळगाव शहरात संतापाची भावना असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
