दुचाकीवर भोवळ आल्याने नियंत्रण सुटले, न्हावी येथील इसमाचा मृत्यू, पत्नी जखमी
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी
आमोदा गावातील बसस्थानक परिसरात घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात न्हावी येथील ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. अचानक भोवळ आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन थेट रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर आदळल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
ही घटना ४ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास आमोदा गावातील बसस्थानकाजवळ घडली. मृत व्यक्ती भगवान वावधन चोपडे (वय ५४, रा. न्हावी, ता. यावल) हे आपल्या पत्नीसह दुचाकीने प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान बसस्थानकाजवळ पोहोचताच त्यांना अचानक भोवळ आली. पत्नीने त्यांना वाहन थांबविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दुचाकी चालू असतानाच त्यांचा तोल गेला आणि वाहन थेट नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर जाऊन धडकले.
या अपघातात भगवान चोपडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही वेळातच पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
या प्रकरणी रमेश टिकाराम चोपडे (वय ४९, रा. न्हावी, ता. यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे न्हावी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
