२७१ वाहनचालकांवर कारवाई, दोन लाखांहून अधिक दंड वसूल
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतूक शिस्त मजबूत करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेकडून विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत बेशिस्त वाहनचालकांवर कठोर पावले उचलत एकाच दिवसात तब्बल २७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही विशेष मोहीम दि. ३ जून रोजी शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आली. हेल्मेट न घालणे, सीटबेल्टचा वापर न करणे, सिग्नल तोडणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना या मोहिमेत लक्ष्य करण्यात आले. या कारवाईतून एकूण दोन लाख तीन हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतुकीच्या वाढत्या गर्दीमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे अनेक वाहनचालकांना नियमभंगाबाबत जागरूक संदेश मिळाल्याचेही स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट आणि सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळल्यास गंभीर अपघात टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकारी आणि तेवीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई प्रभावीपणे पार पाडली.
यापुढेही अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
