मैत्रिणीनेच ओढले व्यसनात नंतर व्यसन, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार आरोप पोक्सो अंतर्गत तिघांवर गुन्हा
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
शहरात महाविद्यालयीन तरुणीला अमली पदार्थांच्या व्यसनाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आणि अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाणे येथे तिघा संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण शालेय जीवनापासून परिचित होत्या. पुढे महाविद्यालयीन वयात या मैत्रिणीच्या माध्यमातूनच पीडितेचा काही तरुणांशी संपर्क झाला. याच मैत्रिणीने सुरुवातीला तिला सिगारेटचे व्यसन लावले, त्यानंतर हळूहळू दारू आणि अमली पदार्थांच्या सेवनाकडे वळवून तिला पूर्णपणे व्यसनाच्या जाळ्यात अडकवण्यात आले, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
व्यसनाच्या अवस्थेचा गैरफायदा घेत संशयित आरोपींनी तिला विविध ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही उघड झाले आहे. या दरम्यान आरोपींनी पीडितेचे खाजगी व अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, तसेच काही काळ तिला स्वतःच्या ताब्यात ठेवून वारंवार अत्याचार करण्यात आले, असेही तक्रारीत नमूद आहे.
काही दिवसांनी पीडित तरुणीने आरोपीशी संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपीच्या ओळखीतील दुसऱ्या संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील संदेश पाठवून तिचा मानसिक छळ सुरू ठेवला. तर तिसऱ्या संशयिताने तिला अमली पदार्थ पुरवल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
सततच्या अत्याचार आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धैर्य एकवटत संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांच्या सोबत ती थेट रामानंद नगर पोलीस ठाणे येथे पोहोचली आणि अधिकृत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांविरुद्ध पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
