अल्पवयीन चालकामुळे मोठी दुर्घटना नियंत्रण सुटताच नऊ जणांवर कार चढली
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
शहरातील रामानंद नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’च्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात असलेल्या भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या नऊ जणांना उडविल्याने मोठी खळबळ उडाली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास रामानंद नगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने एमएच-१५ एफटी-७२०१ क्रमांकाची कार भरधाव वेगाने धावत होती. ही कार सुमारे १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चर्चजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्यावरील पादचारी व नागरिकांना एकामागोमाग धडक देत अक्षरशः उडवून लावले.
काही क्षणांतच घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली आणि बंद पडली. मात्र, अपघात घडवून आणणारा अल्पवयीन चालक तात्काळ वाहनातून बाहेर पडून घटनास्थळावरून फरार झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन दाम्पत्यांसह अन्य नागरिकांचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे.
या भीषण धडकेत कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन कसे आले, वाहन मालक कोण आहे आणि निष्काळजीपणाबाबत कोणावर जबाबदारी निश्चित होणार याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहरातील गर्दीच्या मार्गावर घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना वाहने देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
