एका दिवसात ५०० अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे
साईमत/चोपडा/ प्रतिनिधी :
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपालिकेने मंगळवारी मोठी आणि निर्णायक कारवाई केली. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एका दिवसात तब्बल ५०० अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही मोहीम शहराच्या विविध भागांत विस्तारली. मच्छी मार्केट, आझाद चौक, विठ्ठल मंदिर चौक, बोहरा गल्ली, मेन रोड, चावडी चौक आणि गोलमंदिर चौक या अत्यंत गर्दीच्या आणि महत्त्वाच्या भागांमध्ये नगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली. तीन स्वतंत्र पथके आणि तीन जेसीबींच्या सहाय्याने ही संपूर्ण मोहीम पार पाडण्यात आली.
या कारवाईत सुमारे १५० कर्मचारी दिवसभर सहभागी झाले होते. रस्त्यांवर अनधिकृतपणे उभारलेली दुकाने, टपऱ्या, शेड, फलक आणि फुटपाथवरील अडथळे हटवण्यात आले. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले.
कारवाईपूर्वी नगरपालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या तसेच दवंडीच्या माध्यमातूनही अतिक्रमणे स्वखर्चाने हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला, मात्र उर्वरित अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात आली.
नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम केवळ एकदिवसीय नसून शहर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात आली आहे. दहा सदस्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून ते दररोज शहरात गस्त घालणार आहे. नव्याने अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेत नगरपालिकेसोबत महावितरण, पोलिस प्रशासन आणि दंगा नियंत्रण पथकाचेही सहकार्य लाभले. सर्व विभागांच्या समन्वयामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता कारवाई शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण झाली.
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर गंभीर समस्या निर्माण झाली होती. या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहर अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
