महापालिकेकडे हॉकर्स झोन तयार करण्याची मागणी
साईमत/जळगाव / प्रतिनिधी :
शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे फेरीवाले व हातगाडीधारकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित करून अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन वाहतुकीला शिस्त लागत असली तरी दुसरीकडे लघु व्यवसायांवर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांमध्ये आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, शहरातील मोठा घटक हा हातगाडी, फेरीविक्री आणि लघु व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ कारवाई न करता नियोजनबद्ध उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. योग्य ठिकाणी हॉकर्स झोन विकसित केल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, तसेच वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
हॉकर्स झोनमुळे शहराला अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याबरोबरच महानगरपालिकेला नियमित महसूल मिळण्याचा नवा स्रोत निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर फेरीवाले व हातगाडीधारकांना कायदेशीर व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करण्याची संधी मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, हॉकर्ससाठी जागा निश्चिती करून तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी आणि या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, अशीही ठोस मागणी करण्यात आली आहे.
शहरातील फेरीवाले व लघु व्यावसायिकांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
