साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी नेल आर्टच्या प्रशिक्षण वर्गासाठी जात होती. डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात पोहोचल्यानंतर ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच असल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनीने तातडीने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह तिने कांदिवली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी मेट्रो स्थानक परिसरातील आणि लिफ्टजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत. संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक साधनांचीही मदत घेतली जात आहे. या घटनेमुळे मेट्रो स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
