नियम मोडल्यास दंडाची कारवाई निश्चित
साईमत/जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचा कडक इशारा महापालिकेने दिला आहे. स्वच्छतेबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेने व्यापारी शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत गोलाणी संकुलातील स्वच्छता, बंद अवस्थेतील कचरा कुंड्या आणि इतर नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त युरेश सुप्रिया यांची भेट घेऊन संकुलातील विविध समस्या मांडल्या. विशेषतः कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार, बंद पडलेल्या कचरा कुंड्या आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावर महापालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत व्यापाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. दुकानदारांनी दुकानासमोर कचरा टाकू नये, तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच महापालिकेकडे द्यावा, असे सक्त निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
दरम्यान, बैठकीत व्यापाऱ्यांनी बंद अवस्थेतील कचरा कुंड्यांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. ग्राहकांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेल्या अनेक कचरा कुंड्या सध्या निष्क्रिय अवस्थेत असून काही कचरा कुंड्या बंद लिफ्टजवळ ठेवण्यात आल्याने त्यांचा वापर होत नसल्याची तक्रार करण्यात आली.
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणेला तातडीने त्या कचरा कुंड्या पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे गोलाणी व्यापारी संकुलातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, व्यापाऱ्यांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची तयारी दर्शविल्याचे बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.
