दर गुरुवारी नागरिकांच्या भेटीला जिल्हाधिकारी तक्रारींना मिळणार QR कोड ट्रॅकिंग सुविधा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेत सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने नवा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. ‘जनसमाधान बैठक’ या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आता नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी जिल्हा मुख्यालयात धाव घ्यावी लागणार नाही, तर उपविभागीय स्तरावरच थेट प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांची असून, ते स्वतः दर गुरुवारी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. यामुळे महसूल, स्थानिक प्रशासन आणि इतर विभागांशी संबंधित प्रश्नांचा निपटारा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
तक्रारींचा डिजिटल मागोवा QR कोडद्वारे
या उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. ‘जनसमाधान पोर्टल’ आणि QR कोड प्रणालीच्या मदतीने प्रत्येक अर्जाचे तत्काळ डिजिटायझेशन केले जाणार आहे.अर्ज नोंदवल्यानंतर प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र QR कोड दिला जाईल, जो नागरिकांना मुद्रित स्वरूपात मिळेल.
हा QR कोड स्कॅन करून नागरिकांना त्यांच्या तक्रारीची सद्यस्थिती, संबंधित विभागाकडील कार्यवाही आणि प्रलंबित स्थितीची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. तसेच प्रणालीद्वारे संबंधित कार्यालयांना स्वयंचलित स्मरणपत्रेही पाठवली जाणार असल्याने कामकाजात गती येणार आहे.
कोणत्या तक्रारींना नाही स्थान
‘जनसमाधान बैठक’ ही केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांसाठी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे माहिती अधिकार अर्ज, लोकशाही दिनातील अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणे, भ्रष्टाचारविषयक समितीकडील तक्रारी तसेच सेवाविषयक व बदली संदर्भातील मागण्या या बैठकीत स्वीकारल्या जाणार नाहीत.
उपविभागनिहाय वेळापत्रक जाहीर
जिल्ह्यातील आठ उपविभागीय कार्यालयांमध्ये चक्राकार पद्धतीने दर गुरुवारी या बैठका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक असे—
- फैजपूर – ४ जून
- पाचोरा – ११ जून
- भुसावळ – १८ जून
- एरंडोल – २५ जून
- चाळीसगाव – २ जुलै
- अमळनेर – ९ जुलै
- जामनेर – १६ जुलै
- जळगाव – २३ जुलै
प्रत्येक ठिकाणी सुमारे ६० दिवसांच्या अंतराने पुन्हा बैठक होणार असल्याने नागरिकांना सातत्याने प्रशासनाशी संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांनी पुढे येऊन आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन केले आहे. “प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी ठरलेल्या दिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि उत्तरदायी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
