दुचाकीस्वार ठार महिला गंभीर जखमी चालक फरार तपास सुरू
साईमत/यावल/ प्रतिनिधी :
यावल–भुसावळ मार्गावरील अंजाळे घाट परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे आपल्या मोटरसायकलने भुसावळहून यावलकडे परतत होते. त्यांच्या सोबत त्यांची वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या देखील होत्या. त्याच वेळी यावलच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने अंजाळे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका भीषण होता की लखन जोहरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला.
गंभीर जखमी झालेल्या अनिता जोहरी यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अंजाळे घाट परिसरात जड वाहनांची भरधाव वाहतूक आणि वेगमर्यादेचे वारंवार होणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावर कठोर वाहतूक नियंत्रण आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या अपघातामुळे जोहरी कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
