साईमत न्यूज नेटवर्क –
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एक धक्कादायक घटना समोर आली असून नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. आरोपीला मदत करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत 15 जणांवर एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेत सवलत देण्याच्या बदल्यात PSI गांगुर्डे याने 1 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात तक्रारदाराने Anti-Corruption Bureau (ACB) कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB पथकाने गुप्तपणे पडताळणी केली असता गांगुर्डे याने लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे, गांगुर्डे याला नुकतीच सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीनंतर तो पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणासाठी जाणार होता. मात्र, त्याच दिवशी लाच प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ACB अधिकारी करत आहेत.
