अन्नसुरक्षा विभागाची मोठी कारवाई
साईमत/धरणगाव / प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यात कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, अन्नसुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणात संबंधित संशयितावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भवरखेडा येथील सोमनाथ आनंद माळी (वय ३२) याच्यावर रिफाइंड पामोलीन तेल आणि विविध रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिम दूध तयार केल्याचा आरोप आहे. हे भेसळयुक्त दूध मूळ दुधात मिसळून त्यातील फॅटचे प्रमाण वाढवले जात होते आणि आर्थिक लाभासाठी त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल येथे अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई; तरीही अवैध धंदा सुरूच
विशेष म्हणजे जुलै २०२५ मध्येही याच संशयितावर याच ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्या वेळी कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायने, उपकरणे आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत त्याने कृत्रिम दूध तयार करून विक्री करत असल्याची कबुली दिल्याचे समोर आले होते.
तरीदेखील त्याने पुन्हा हा अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने प्रशासनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून संयुक्त छापा
मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अन्नसुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, पामोलीन तेल आणि विविध उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, दुधासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
