सुपारी बाग परिसरात २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
साईमत/जामनेर / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुपारी बाग परिसरातील निर्जन भागात एका २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मृत तरुणाचे नाव असून तो मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर बुधवारी सकाळी सुपारी बाग परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवला.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तरुणाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तीव्र उन्हामुळे उष्माघात झाल्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कुटुंबीयांनी या निष्कर्षांवर आक्षेप घेत घातपाताचा संशय व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रितेशच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार असून तो शांत स्वभावाचा असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. त्याला कोणाशीही वैर नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
