मित्रांना वाचवताना जीव गमावला एमएसएफ जवानाचा दुर्दैवी अंत
साईमत/यावल/ प्रतिनिधी :
यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाराष्ट्र सुरक्षा बलातील (एमएसएफ) जवानाचा चंद्रपूर येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजय ओंकार काळे (वय ३४) असे मृत जवानाचे नाव असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, केवळ आठवडाभरात गावातील दुसऱ्या तरुणाच्या मृत्यूची ही घटना असल्याने गाव अक्षरशः शोकसागरात बुडाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवासी असलेले विजय काळे हे मागील चार वर्षांपासून चंद्रपूर येथे महाराष्ट्र सुरक्षा बलात (एमएसएफ) कार्यरत होते. दिनांक २६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास ते आपल्या दोन मित्रांसह चंद्रपूर येथील एका तलावात पोहण्यासाठी गेले होते.
पोहत असताना त्यांच्या मित्रांना अचानक अडचण निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्यांनी दोघांनाही वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते स्वतःच पाण्यात बुडाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
त्यानंतर दिनांक २७ रोजी पहाटे त्यांच्या मृतदेहाचा तलावातील पाण्यावर तरंगताना शोध लागला. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
विजय काळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही या घटनेनंतर शोकमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, दहिगाव गावात गेल्या आठवड्यातही दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावकरी आधीच धक्क्यात होते. अशातच पुन्हा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सलग शोकसत्र निर्माण झाले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
