साईमत न्यूज नेटवर्क –
इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी परिसरात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुख्य वीजवाहिनीचा प्रवाह उतरलेल्या खांबाला धक्का लागल्याने हा अपघात झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र अशोक भगत (वय ४०, रा. घोटीवाडी, ता. इगतपुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटीवाडी परिसरात आवादा ग्रीन प्रोजेक्ट या खासगी ठेकेदारामार्फत वीज वितरण कंपनीकडून नवीन विद्युत वाहिनीचे काम सुरू होते. या कामांतर्गत मुख्य वीजवाहिनीचे खांब उभारण्यात आले होते. मात्र, सुरक्षेची आवश्यक काळजी न घेता वीजवाहिनी सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मंगळवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास राजेंद्र भगत हे शेताच्या दिशेने जात असताना मुख्य वीजवाहिनीचा प्रवाह उतरलेल्या खांबाला त्यांचा स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी ठेकेदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर तातडीने कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, इगतपुरी निरीक्षक सारिका आहिरराव, वाडीव-हे निरीक्षक महाजन यांच्यासह पोलिस अधिकारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. नाशिक, निफाड, सिन्नर आदी भागांतूनही अतिरिक्त पोलिस पथके मागविण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी उपनिरीक्षक पी. पी. भिंगारदे अधिक तपास करीत असून, ठेकेदाराच्या कामातील निष्काळजीपणाबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे घोटीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
