रेल्वे स्टेशन परिसरात हातगाड्यांवर कारवाई
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी मोठी धडक मोहीम राबवत फुले मार्केट, रेल्वे स्टेशन परिसरासह तीन प्रमुख ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेली हातगाड्या व विविध व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले.
ही संयुक्त मोहीम जळगाव महानगरपालिका च्या अतिक्रमण निर्मूलन पथकांनी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राबवली. तीन स्वतंत्र पथकांच्या मदतीने शहरातील गर्दीच्या भागांमध्ये अचानक कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले.
फुले मार्केट परिसरात काही फेरीवाले आणि दुकानदारांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्याने नागरिक आणि मूळ दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वीही या भागात कारवाई करण्यात आली होती, मात्र पुन्हा अतिक्रमण वाढल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेत आज पुन्हा कारवाई करत साहित्य जप्त केले.
रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातही अनधिकृत हातगाड्या व दुकानांमुळे प्रवाशांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे हा परिसर सातत्याने वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला होता. आजच्या कारवाईनंतर या भागात काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत वाहतूक सुविधा मिळण्यासाठी अतिक्रमणाविरोधातील मोहिम पुढेही सुरूच राहणार असून, पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
