“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” – जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवा वेगाने पसरल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका,” असे ठाम आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले असून जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत इंधन पुरवठा व्यवस्था, साठा स्थिती आणि सोशल मीडियावरील अफवांचा प्रभाव याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष पाहणी
अफवांची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी इंधन साठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांची गर्दी याची तपासणी करण्यात आली.
प्रशासनाने स्पष्ट केले की जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नाही. काही ठिकाणी तात्पुरता साठा कमी झाल्याचे दिसून आले असले तरी तातडीने नवीन पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण ३७१ पेट्रोल पंप असून सर्व ठिकाणी नियमित पुरवठा सुरू आहे. अतिरिक्त साठा देखील ट्रान्झिटमध्ये असल्याने पुरवठा साखळी अखंडित राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू
जिल्ह्यात इंधन पुरवठा करणाऱ्या प्रमुख कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल, नायरा एनर्जी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
“अफवांवर विश्वास ठेवू नका”
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांमुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भीतीपोटी अतिरिक्त इंधन साठा करू नये, वाहनांच्या रांगा लावू नयेत तसेच कॅनमध्ये इंधन भरून नेणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने इशारा दिला आहे की अफवा पसरविणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारे चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
तक्रारीसाठी हेल्पलाइन जाहीर
नागरिकांनी कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे जिल्ह्यातील इंधन पुरवठा व्यवस्था सुरळीत असून नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून संयम बाळगावा, असे स्पष्ट चित्र या संपूर्ण कारवाईतून समोर आले आहे.
