वृंदावन अपार्टमेंटमध्ये खळबळ दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव प्रिया दिलीप श्रीश्रीमाळ (वय ४०, रा. वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर नगर) असे असून त्या अपार्टमेंटमध्ये एकट्याच वास्तव्यास होत्या. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
शुक्रवारी सकाळी अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. काही रहिवाशांनी तत्काळ ही बाब जिल्हापेठ पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित फ्लॅटचा दरवाजा आतून बंद नसून लोटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच प्रिया श्रीश्रीमाळ या जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.
घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्हापेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
