विवाहाची तयारी सुरू असतानाच शोककळा रोटावेटर कामादरम्यान भीषण अपघात २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
साईमत/यावल/ प्रतिनिधी :
तालुक्यातील दहिगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रोटावेटरचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे मृत तरुणाचा विवाह अवघ्या दहा दिवसांवर ठरलेला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव योगेश यशवंत पाटील असे असून, तो दहिगाव येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हा बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर तो रोटावेटरच्या यंत्रात अडकून गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
घटना घडताच ट्रॅक्टर अनियंत्रित अवस्थेत पुढे जाऊन शेजारील शेतात पोहोचला. जवळच निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने हा प्रकार पाहून तत्काळ धाव घेत ट्रॅक्टर बंद केला. त्यानंतर त्याने तातडीने योगेशच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर अवस्थेत योगेशला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.
योगेश पाटील याचा विवाह येत्या ४ जून रोजी होणार होता. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून परिसर शोकमग्न झाला आहे.
शेतीकाम करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात, अशी चर्चा परिसरात नागरिकांमध्ये होत आहे.
