उन्हाळ्यात दिलासा; बंद हातपंप पुन्हा सुरू
साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी :
तालुक्यातील धरणगाव येथील गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले हातपंप अखेर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. वाढत्या तापमानामुळे आणि गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हातपंप पुन्हा कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करुणा बुद्ध विहार परिसरातील हातपंप मागील तब्बल दोन वर्षांपासून बंद अवस्थेत होता. त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश झनके आणि अशोक झनके यांनी पुढाकार घेत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी लावून धरली.
या पाठपुराव्याची दखल घेत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने तात्काळ हालचाली करत दुरुस्ती पथक धरणगाव येथे पाठवले. पथकाने करुणा बुद्ध विहार परिसरातील हातपंप दुरुस्त करून तो पुन्हा सुरू केला. तसेच स्मशानभूमी परिसरातील आणि आशाबाई इंगळे यांच्या घराजवळील हातपंपही दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले.
हातपंप पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, दीर्घकाळ भेडसावणाऱ्या पाणी समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित अधिकारी तसेच सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
