जळगाव मनपातील शिवसेना नगरसेवकांचा उमेदवारीसाठी आग्रह
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नावाला अधिक बळ मिळताना दिसत आहे. जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीनंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा आणखी रंगली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट घेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे संकेत दिले. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना शासन स्तरावर ठोसपणे मांडण्याची क्षमता प्रतापराव पाटील यांच्यात असल्याचे नगरसेवकांनी यावेळी नमूद केले.
बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रतापराव पाटील यांच्या संघटन कौशल्याचा आणि जनसंपर्काचा विशेष उल्लेख केला. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने घेतलेली भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेला संवाद यामुळे त्यांची उमेदवारी पक्षासाठी लाभदायक ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होताच शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत महायुतीची ताकद अधिक वाढेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महायुतीच्या हायकमांडकडून अंतिम निर्णय अद्याप बाकी असला तरी, जळगावातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी प्रतापराव पाटील यांच्या नावासाठी उघडपणे पाठिंबा दर्शवल्याने विधानपरिषद उमेदवारीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
