१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ४ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगावमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी आणि प्रभावी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ८७ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. १७ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाघ नगर येथील रहिवासी तथा फिर्यादी संतोष रणछोड सैंदाणे यांची होंडा शाईन मोटारसायकल (MH 19 CL 7558) सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 433/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने विशेष पथक स्थापन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे व चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळासह जळगाव शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी ‘नेत्रम’ कार्यालयातील पोलीस कर्मचारी मुबारक देशमुख यांच्या मदतीने करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींची ओळख पटविण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी १) महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटे नगर, जळगाव) आणि २) मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये—
- ५०,००० रुपयांची होंडा शाईन (MH 19 CL 7558)
- ५२,००० रुपयांची TVS वेगो मोपेड (MH 19 CA 5949)
- ५०,००० रुपयांची हिरो डिलक्स (MH 18 AK 0235)
- ३५,००० रुपयांची बजाज पल्सर (MH 19 ER 5456)
अशा एकूण १,८७,००० रुपयांच्या दुचाकींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि गुन्हे शोध पथकातील इतर अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलिसांच्या या जलद व तांत्रिक तपासामुळे जळगाव शहरात सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
