स्थानिक औषध विक्रेत्यांचे एकजूट प्रदर्शन, तहसीलदारांना निवेदन सादर
साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी :
ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या व्यावसायिक धोरणांविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला मलकापूर शहरात औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आपला तीव्र विरोध नोंदवला.
या आंदोलनाचे नेतृत्व केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मलकापूरने केले. शहरातील रिटेल तसेच होलसेल औषध विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकजूट दाखवली. बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत दिवसभर औषध विक्री व्यवहार ठप्प राहिला.
औषध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, औषध विक्री व्यवसाय हा ड्रग्स ॲण्ड कॉस्मेटिक्स ॲक्ट १९४० व १९४५ अंतर्गत नियंत्रित आहे. मात्र, या कायद्यात ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर ई-फार्मसीच्या माध्यमातून औषधांची विक्री सुरू आहे. कोरोना काळात होम डिलिव्हरीला दिलेली सवलत अद्याप मागे घेण्यात आलेली नसल्याने ऑनलाइन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचे आणि पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्री प्रणालीवर कठोर निर्बंध घालून स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाल मालपाणी, उपाध्यक्ष खालीद अमन, सचिव नीरज चवरे, ज्येष्ठ सदस्य जयचंद पारख यांच्यासह अनेक पदाधिकारी व औषध विक्रेते उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला स्पष्ट इशारा देत आपली मागणी ठामपणे मांडण्यात आली.
