५ लाखांची मागणी, ३ लाखांवर तडजोड अखेर एसीबीची कारवाई
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
सहकार क्षेत्रात खळबळ उडवणारी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज जळगावमध्ये केली आहे. अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता स्वीकारताना उपनिबंधक व एका खाजगी इसमाला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव येथील सहकारी संस्थांचे वर्ग-१ चे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर अवैध सावकारी कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून, त्याची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव येथे प्रलंबित होती.
या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध नकारात्मक अहवाल न पाठवता अनुकूल अहवाल देण्यासाठी उपनिबंधक बारी यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर एसीबीने केलेल्या पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली. “तुम्ही मागील प्रकरणात वकील लावून आमचे मोठे नुकसान केले, म्हणून मी नकारात्मक अहवाल दिला होता. आता अनुकूल अहवाल देतो,” असे म्हणत बारी यांनी ३ लाख रुपयांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झाले. तसेच या रकमेतील पहिला हप्ता खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील याच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
आज (२० मे २०२६) एसीबीच्या पथकाने बी. जे. मार्केट परिसरातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात सापळा रचला. उपनिबंधक बारी यांच्या सूचनेनुसार देविदास पाटील यांनी तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.
