एमआयडीसीत रात्रीच्या पेट्रोलिंगचा प्रस्ताव पोलीस-उद्योजक समन्वय वाढणार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी भूषवले असून, एमआयडीसीतील उद्योजक व कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या सुरक्षा आव्हानांवर सविस्तर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
जळगाव मधील औद्योगिक परिसरात अलीकडच्या काळात घडणाऱ्या चोरीच्या घटना, अपघात आणि संभाव्य गुन्हेगारी हालचाली लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या स्पष्ट सूचना या वेळी देण्यात आल्या. कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, तसेच मजबूत कंपाउंड वॉल आणि प्रवेश-निर्गमन नियंत्रण प्रणाली काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाने दिले.
अपघात, अमली पदार्थांवर कठोर लक्ष
औद्योगिक परिसरात वाढणाऱ्या वाहतूक अपघात व औद्योगिक दुर्घटनांबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कामगारांना नियमित सुरक्षा प्रशिक्षण देणे, अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत ठेवणे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील काही औद्योगिक भागांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसीमध्येही अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.
कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
ब्लॅकमेलिंगविरुद्ध कठोर भूमिका
या बैठकीत पोलीस प्रशासनाने उद्योजकांना स्पष्ट आणि ठाम आश्वासन देत औद्योगिक परिसरात कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र, ब्लॅकमेलिंग किंवा त्रासदायक संघटनात्मक हालचाली खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा कठोर इशारा दिला.
तसेच उद्योग क्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही आंदोलन किंवा संघटनात्मक उपक्रमांची पूर्वसूचना पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जळगावच्या आर्थिक विकासासाठी भयमुक्त आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. कामगारांची चारित्र्य पडताळणी काटेकोरपणे करण्यावर आणि परिसरातील अतिक्रमण रोखण्यावरही विशेष भर देण्यात आला.
याशिवाय एमआयडीसी प्रशासनाने वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्यास सशस्त्र पोलिसांसह प्रभावी नाईट पेट्रोलिंग सुरू करण्याची तयारीही पोलिसांनी दर्शवली.
समन्वयातून सुरक्षित औद्योगिक वातावरणाचा संकल्प
प्रशासनाच्या वतीने ही बैठक प्रामुख्याने प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीपर उपक्रमाचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उद्योग क्षेत्र आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून सुरक्षित व गुन्हेमुक्त औद्योगिक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीस एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नामवंत उद्योजक तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
