साईमत न्यूज नेटवर्क –
जळगाव : यंदाच्या मे महिन्यात जळगाव जिल्ह्यात कडक उन्हाचा कहर सुरूच असून तापमानाने ४३ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. सलग काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मंगळवारी शहर आणि जिल्ह्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये पावसाची आशा निर्माण झाली होती. मात्र, तापमानात फारसा फरक न पडता पारा ४३.४ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या जिल्ह्यात मोठ्या किंवा व्यापक पावसाची शक्यता कमी आहे. किनारपट्टी भागात हवामान प्रणाली अधिक सक्रिय असल्याने उत्तर महाराष्ट्रात केवळ स्थानिक बदल जाणवू शकतात. त्यामुळे काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर न येता काहीसा दिलासा मिळाला असला तरी आर्द्रता वाढल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडावा मिळण्याऐवजी दमट आणि घामाघूम करणाऱ्या हवामानाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, जळगावकर आता पावसाच्या प्रत्यक्ष आगमनाकडे आशेने पाहत आहेत.
