ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीत राहत होते आरोपी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
साईमत न्यूज नेटवर्क –
बिहारमधील एका कुटुंबातील चार जणांच्या निर्घृण हत्याकांडातील दोन मुख्य आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शेंद्रा एमआयडीसी परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गौतम उर्फ राहुल गुप्ता (वय २२, रा. डहरक, बिहार) आणि दीपक देवसिंग राजपूत (वय २७, रा. नाचनवेल, कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विकास गुप्ता याला बिहार पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मृतदेहांचे तुकडे करून ते सुटकेस आणि प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून ते नदी व कालव्यात फेकण्यात आले होते. तसेच घरातील रक्ताचे डाग धुवून त्यावर सिमेंट टाकून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यात टेलरचा टॅग आणि कपड्यांवरील नोंदणी क्रमांक महत्त्वाचा ठरला. याच आधारे पोलिसांनी तपासाची दिशा घेत आरोपींचा माग काढला. तांत्रिक तपासाद्वारे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर बिहार पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला.
त्यानंतर जाधववाडी परिसरातील शरद टी पॉईंट येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने केली. अटकेनंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, ७ मे रोजी घडलेल्या या घटनेत कृष्ण मुरारी आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या दोन लहान मुलांचीही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
