साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील गरीब नगर परिसरात मंगळवार सकाळपासून पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ५०० हून अधिक बेकायदेशीर घरे पाडण्यात आली असून संपूर्ण परिसरात सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. कारवाई सुरू होण्यापूर्वीच बहुतांश रहिवाशांनी आपली घरे रिकामी केली होती. अनेक कुटुंबांनी घरातील साहित्य रस्त्यावर आणून ठेवत आपली घरे सोडली.
कारवाईसाठी दोन बुलडोझरचा वापर करण्यात आला असून बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, सार्वजनिक जागा कायद्याअंतर्गत २०१७ पासून या प्रकरणाची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१7 रोजी अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे कारवाईला विलंब झाला.
हे प्रकरण जवळपास नऊ वर्षे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. अखेर २९ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला अतिक्रमण हटवण्याची परवानगी दिली. या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्याने कारवाईला अंतिम हिरवा कंदील मिळाला.
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सर्वेक्षणात अतिक्रमण म्हणून नोंद झालेली बांधकामे हटवण्यात येत आहेत. रेल्वे रुळांच्या अगदी जवळ ही वस्ती असल्याने प्रवासी व रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत होता. तसेच भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही हा परिसर मोकळा करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
