२०० नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ
साईमत/चोपडा/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा लोकाभिमुख सामाजिक उपक्रम सौ. संध्या महाजन (नगरसेविका, प्रभाग क्र. १३, चोपडा नगरपरिषद तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष) व श्री. नरेश महाजन यांच्या संयुक्त पुढाकारातून यशस्वीपणे संपन्न झाला.
दि. १६ एप्रिल रोजी मल्हारपुरा कन्या शाळा क्रमांक २ येथे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील सुमारे २०० ते २२५ महिला व पुरुष नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. डी. ओ. पाटील, डॉ. अशोक कदम, डॉ. सागर पाटील व डॉ. गौरव नेवे यांनी सहभाग घेतला. तपासणीदरम्यान मधुमेह, फुफ्फुसांचे विकार, पोटाचे आजार, लिव्हर समस्या, सोरायसिस, कावीळ तसेच अस्थिरोग यांसारख्या आजारांचे निदान करण्यात आले. काही रुग्णांना पुढील उपचार व सखोल तपासणीसाठी आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.
या प्रसंगी पात्र लाभार्थींना महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय सुविधा, उपचार प्रक्रिया व विविध लाभांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. रोहन पाटील, तालुकाप्रमुख कांतीलाल पाटील, सरचिटणीस अशोक शिंपी, भाजपा शहराध्यक्ष वैशाली भावसार तसेच वैशाली माळी उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र महाजन, भैय्या गुलाब महाजन, आप्पा राज, बाळा माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांची सातत्याने आवश्यकता असल्याची भावना व्यक्त केली आहे.
