गुन्हेगारी रोखण्यासाठी जळगाव पोलिसांची ‘कॉन्व्हिक्शन मिशन’ मोहीम
जळगाव :
जिल्ह्यातील गुन्हेगारांना न्यायालयातून सहज सुटका मिळू नये, तपास अधिक सक्षम आणि शास्त्रोक्त व्हावा तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने जळगाव पोलीस दलाच्या वतीने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून आयोजित ही अभ्यासपूर्ण कार्यशाळा जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या पाच तासांच्या या सत्रात तपास प्रक्रियेतील बारकावे, कायद्यातील बदल आणि भक्कम पुरावे संकलन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
गुन्ह्यांचा तपास करताना राहून गेलेल्या तांत्रिक त्रुटी, अपुरे वैज्ञानिक पुरावे किंवा परिस्थितीजन्य पुराव्यांचा अभाव यामुळे अनेकदा आरोपींना न्यायालयातून दिलासा मिळतो. तपासातील या उणिवा पूर्णपणे दूर करून दोषारोपपत्र अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना थेट न्यायव्यवस्थेतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जजेस एम. एस. बडे, एस. व्ही. खोंगल, एम. जी. चव्हाण, के. के. चाफळे, डीजीपी काब्रा, चोरडिया तसेच प्रॉसिक्यूशन डायरेक्टर श्रीमती ढगे उपस्थित होत्या. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, एसडीपीओ, दुय्यम अधिकारी आणि १०० हून अधिक अंमलदारांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
न्यायाधीश आणि सरकारी वकिलांनी मार्गदर्शन करताना न्यायालयीन प्रक्रियेत साक्ष नोंदवताना घ्यावयाची काळजी, तपासातील कागदपत्रांची अचूकता आणि पुरावे सादर करण्याची पद्धत याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. केवळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करणे हीच पोलिसांची जबाबदारी नसून, न्यायालयात सबळ पुरावे टिकवून आरोपीला शिक्षा मिळवून देणे ही तपास यंत्रणेची खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेदरम्यान वैज्ञानिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे, डिजिटल पुरावे आणि सरकारी वकिलांशी समन्वय यावर विशेष भर देण्यात आला. बदलत्या गुन्हेगारी पद्धतींना तोंड देण्यासाठी तपास अधिक तांत्रिक आणि पुराव्याधारित करण्याची आवश्यकता उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केली.
या कार्यशाळेमुळे आगामी काळात जळगाव पोलीस दलाच्या तपास पद्धतीत गुणात्मक बदल घडतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून न्यायालयात अधिक भक्कमपणे खटले मांडले गेल्यास गुन्हेगारांना वेळेत शिक्षा होईल आणि जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी वचक निर्माण होण्यास मोठी मदत मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
