अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पुलाजवळ तसेच नवीन तिकीट घर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, शिवाजीनगर अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेल्या कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या पाचव्या बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११.४० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक किरण महाजन तसेच फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
घटना रेल्वे पुल परिसरात घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आगीमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, कोळशामधील वाढलेली उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.
अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले जात आहे.
