एसपी श्रीकांत धिवरे स्वतः उतरले मैदानात
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि वाईन शॉपच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तळीरामांविरोधात जळगाव पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईचे नेतृत्व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केल्याने मद्यपींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अचानक पोलिसांचा फौजफाटा आणि त्यात स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर पाहून अनेक तळीरामांनी अक्षरशः पळ काढल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध वाईन शॉप्स, बिअर शॉपी आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषतः सायंकाळच्या वेळी काही भागांमध्ये मद्यपींचा उच्छाद वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध भागांमध्ये अचानक गस्त घालत कारवाई सुरू केली. वाईन शॉपच्या आडोशाला तयार झालेल्या बेकायदेशीर अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना जागेवरच ताब्यात घेतले. अनेकांवर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
या धडक कारवाईमुळे शहरातील काही वाईन शॉप चालक आणि त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत प्रकारांनाही मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“सार्वजनिक शांतता, महिलांची सुरक्षा आणि नागरिकांचा सुरक्षित वावर याला जळगाव पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून उपद्रव करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील,” असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे जळगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः महिला वर्गाने पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
