आईशी शेवटचा कॉल ठरला साक्षीदार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१५ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, मृत्यूपूर्वी आईशी झालेला शेवटचा संवाद आणि त्या वेळी सुरू असलेला मोबाईल कॉल या घटनेमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच हृदयद्रावक ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे रोजी घरातून निघून गेले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी दोघे जळगाव रेल्वे स्थानकात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला ताब्यात घेतले.
तरुणीला नातेवाईक घेऊन गेल्यानंतर गणेशने आईला फोन केला. या दरम्यान त्याने भावनिक संवाद साधत इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करत “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी बोलताना तो म्हणाला, “आई, मी मोठी चूक केली आहे. हा माझा तुला शेवटचा कॉल आहे.” यानंतर काही क्षणातच त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे, उडी घेतल्यानंतरही मोबाईलवरील कॉल सुरूच होता. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले असता मोबाईलवर आईचा आवाज ऐकू येत होता, त्यामुळे उपस्थितांमध्ये काही काळ स्तब्धता पसरली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत मुलीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. दबाव, शिवीगाळ आणि धमक्या देऊन गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्राही कुटुंबीयांनी घेतला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
