बंद एसीमुळे महासभेत नगरसेवक घामाघूम
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. अशा भीषण उकाड्यात जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट नगरसेवकांनाच बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद असल्याने महासभेदरम्यान नगरसेवक अक्षरशः घामाघूम झाले.
गुरुवारी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची महासभा पार पडली. शहरातील विविध नागरी प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा करण्यासाठी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, सभा सुरू होताच सभागृहातील वाढत्या उकाड्यामुळे वातावरण असह्य बनले. एसी बंद असल्याने सभागृहातील तापमान वाढत गेले आणि त्याचा परिणाम थेट कामकाजावर जाणवू लागला.
महापालिकेच्या मुख्य सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याची माहिती यावेळी समोर आली. भर उन्हाळ्यातही प्रशासनाने या यंत्रणेची दुरुस्ती न केल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. काही नगरसेवकांना उकाड्यामुळे सभागृहात बसणेही कठीण झाले होते. चर्चेदरम्यान अनेक जण घाम पुसताना दिसून आले, तर काहींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला.
“जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सभागृहात येतो; मात्र स्वतः लोकप्रतिनिधींनाच अशा गैरसोयींचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुविधांची स्थिती काय असेल?” असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महासभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे केली. महासभेतील या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
