अधिकृत थांबे असूनही एसटी बसचा दुर्लक्ष; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी :
तालुक्यातील वरणगाव आणि फुलगाव शहरांना लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग बायपासमुळे नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने फुलगाव उड्डाण पुलाखाली दोन पिकअप शेड आणि अधिकृत बस थांबे उभारले आहेत. मात्र, लाखो रुपये खर्च करूनही या ठिकाणी आजतागायत एकही एसटी बस थांबत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, फुलगाव व वरणगाव येथील नागरिकांनी वारंवार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे लेखी निवेदने देऊन या थांब्यावर बस थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच फुलगाव ग्रामपंचायत कडूनही यासंदर्भात अधिकृत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. तरीही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाण पुलाखाली वरणगाव आणि फुलगाव या नावांचे अधिकृत बस थांबे उभारण्यात आले असून प्रवाशांच्या सोयीसाठी पिकअप शेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळा व पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र उपयोगात येत नसल्याने ती केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
दरम्यान, जळगाव, भुसावळ तसेच इतर मार्गांवर धावणाऱ्या सुपरफास्ट बस या पुलावरून नियमित जात असतानाही या अधिकृत थांब्यावर थांबत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे फुलगाव गावातील विद्यार्थी, महिला, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना वरणगाव शहरात जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे. यामुळे विशेषतः विद्यार्थिनी व महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून सामाजिक कार्यकर्त्यांनीही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ फुलगाव उड्डाण पुलाखालील अधिकृत बस थांब्यावर एसटी बस थांबविण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू चौधरी यांनी दिला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रवासी सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
