अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कडक कारवाई १९० हून अधिक आरोपींवर गुन्हे
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाचवेळी समन्वय साधत हातभट्टी, सट्टा-जुगार तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, सट्टा-जुगार अड्डे तसेच प्रोहिबिशन कायद्यांतर्गत कारवाया केल्या. पोलिसांनी ८५ प्रकरणांमध्ये सुमारे २४ लाख ६७ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ८३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच हातभट्टी दारू नष्ट करण्याची मोठी मोहीमही राबविण्यात आली.
सट्टा-जुगार प्रकरणांमध्ये ५८ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे २ लाख २ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ६९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यांतर्गत बाळगणे, पिणे व वाहतूक प्रकरणांमध्ये ३८ गुन्हे दाखल करून १ लाख ४१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
