विजेच्या धक्क्याने २० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू
साईमत/जामनेर/ प्रतिनिधी :
जामनेर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत वीज खांबावर काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून वीज कामांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव सागर इंगळे (वय २०) असे आहे. तो एका खासगी कंत्राटदाराकडे मजूर म्हणून कार्यरत होता. रविवारी रात्री जामनेर वीज कार्यालयाजवळील खांबावरील दुरुस्तीचे काम त्याला देण्यात आले होते.
काम सुरू करण्यापूर्वी मुख्य रोहित्राचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र संबंधित खांबावर दोन स्वतंत्र वीज प्रणाली कार्यरत असल्याची महत्त्वाची तांत्रिक बाब दुर्लक्षित राहिली. गावातील स्ट्रीट लाईटचा वीज प्रवाह सुरूच असल्याने हा अपघात घडला.
सागर इंगळे खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना अचानक त्याचा संपर्क सुरू असलेल्या विद्युत तारांशी आला. त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो अंदाजे नऊ मीटर उंचीवरून थेट जमिनीवर कोसळला. खाली पडताना त्याचे डोके दगडावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला.स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे(महावितरण) च्या कामकाज पद्धती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक समन्वयातील त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे जामनेर परिसरात शोककळा पसरली असून तरुण मजुराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
