धरणगावजवळ धावत्या ट्रकने घेतला पेट
साईमत/मलकापूर / प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगाव पुलाजवळ धावत्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागून ट्रक संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे भीषण स्वरूप पाहता काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक आणि त्यातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक (क्र. एचआर ३९ जी ८०५७) जळगावकडून मलकापूरच्या दिशेने जात होता. धरणगाव परिसरातील पुलाजवळ पोहोचताच ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र, काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले.
आगीमुळे महामार्गावर काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले होते. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच अनेक वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून घटनास्थळी गर्दी केली. काही काळासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता. ट्रकमधील मालही आगीत नष्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
