‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पोलिस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (TOT) प्रशिक्षण स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभरात आपला ठसा उमटविला आहे. उत्कृष्ट शस्त्र हाताळणी, प्रशिक्षण कौशल्य आणि सामूहिक कामगिरीच्या जोरावर जळगाव पोलिसांनी तीन सुवर्णपदके, दोन कांस्यपदके पटकावत ‘उत्कृष्ट टीम’चा मानही पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सोमवार, ११ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक प्रदीप वाघूर तसेच राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुरवाडे यांच्या हस्ते विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या संकल्पनेतून ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. वाढता दहशतवाद, नक्षलवाद, गंभीर गुन्हे आणि शस्त्रसंबंधित घटनांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी पोलिस अधिकारी आणि अंमलदार अधिक सक्षम, प्रशिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सज्ज व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१, पुणे येथे ४ ते ९ मे २०२६ दरम्यान हे प्रशिक्षण पार पडले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलिस अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सय्यद, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पाटील, पोलिस हवालदार रज्जाक सय्यद, संतोष सुरवाडे, महिला पोलिस हवालदार मेघना जोशी, पोलिस नाईक किरण सपकाळे, संदीप पाटील, पोलिस अंमलदार समीर पठाण आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियंका टेकरे यांनी सहभाग घेतला होता.
प्रशिक्षणादरम्यान शस्त्र हाताळणी, अंतर्गत वर्ग फायरिंग, शिकवणी आणि तांत्रिक कौशल्यांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे यांनी ‘शिकवणी’ प्रकारात ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. तर पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सय्यद यांनी याच प्रकारात ७७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकावर नाव कोरले.
पोलिस अंमलदार समीर पठाण यांनीदेखील स्पर्धेत दमदार कामगिरी करत ‘अंतर्गत वर्ग फायरिंग’ प्रकारात ८७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. याशिवाय उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणूनही त्यांनी आणखी एक सुवर्णपदक मिळवले. एकूण ४०० पैकी ३३७ गुण मिळवत त्यांनी विशेष प्रशंसा मिळवली. त्यांच्या या यशामुळे जळगाव पोलिस दलाची राज्यस्तरावरील प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
सामूहिक कामगिरीतही जळगाव पोलिस दलाने प्रथम क्रमांक मिळवत ‘उत्कृष्ट टीम’चा किताब पटकावला. या यशामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलाचा आत्मविश्वास उंचावला असून, आधुनिक, सक्षम आणि सज्ज पोलिस यंत्रणा उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
